व्वा रे व्वा! १० दिवसांची हजेरी अन् लाटला महिनाभराचा पगार; चिखलीच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या डोळ्यात धूळफेक! फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार?

आठवड्यातून, पंधरा दिवसांतून एकदा येत हजेरीपत्रकावर पूर्ण दिवसांच्या सह्या मारून महिन्याचा पगार लाटणे ही शासनाची फसवणूक नाही काय? पगार पत्रक बनवतांना हजेरी रजिस्टर तपासल्या जाते का? तपासल्या जात असेल तर पूर्ण महिन्याचा पगार जातोच कसा? किंवा पूर्ण पगार देण्याच्या मोबदल्यात काही व्यवहार होतो का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी असणारे तालुका आरोग्य अधिकारी उत्तरे शोधतांना दिसत नाहीत. या सगळ्या घोळात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका काय असा सवालही उपस्थित होतोय..
असा आहे सगळा घोळ...
प्राप्त माहितीनुसार कर्मचाऱ्यांचे पगार पत्रक तयार करण्याची जबाबदारी ही कार्यालयातील आस्थापना विभागाची असते. पगार पत्रक तयार करतांना कर्मचाऱ्यांची हजेरी ,गैरहजेरी विचारात घेतल्या जाते. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करून जिल्हापातळीवर पाठवतात व नंतर कर्मचाऱ्यांचे पगार होतात. दरम्यान नोव्हेंबर(२०२२) महिन्याचा पगार हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना मिळाला. एक कर्मचारी तर चक्क २० दिवस गैरहजर असल्याचे हजेरी पत्रकावरील सह्यांवरून दिसते, मात्र तरीही संबंधिताला पूर्ण पगाराचे वाटप झाले. त्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात "त्या" कर्मचाऱ्याने नोव्हेंबरच्या उरलेल्या २० दिवसांच्या आणि डिसेंबर महिन्यातील १४ दिवसांच्या सह्या एकाचवेळी मारल्याचे बुलडाणा लाइव्ह च्या तपासणीत समोर आले.
कारवाई होणार का?
दरम्यान या सगळ्या प्रकरणात कारवाई होणार का? जिल्हा आरोग्य अधिकारी काय कारवाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. याआधी झालेल्या अशा काही प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत..इथेही शासनाची फसवणूक होत असल्याचे उघड दिसत आहे. त्यामुळे संबधित दोषींवर कारवाई होणे अपेक्षित आहे.