धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती गोळा करण्याचे काम जिल्ह्यात सुरू! पोलीस पाटलांना सूचना

 
भोंगा
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवरून राजकारण प्रचंड तापले आहे. मशिदीवरील भोंगे हटविण्यात यावे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली आहे. राज्याच्या या राजकारणाचे पडसाद जिल्ह्यातही उमटत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलीस प्रशासनावर आली आहे. पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पोलीस पाटलांना तशा सूचना पोलीस विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

तुम्ही ज्या गावात पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहात त्या गावात असलेले एकूण धार्मिक स्थळे किती? त्यावर लाऊडस्पिकर किती ? याची माहिती वरिष्ठांना सादर करायची आहे. त्यामुळे तात्काळ माहिती कळवा, असे संदेश पोलीस पाटलांना स्थानिक पोलीस ठाण्यातून देण्यात आले आहेत. माहिती संकलन करताना केवळ विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांची माहिती गोळा केली जात नसून, मंदिर, मशीद, बुद्धविहार, चर्च या सर्वच स्थळांची आणि तिथे लावण्यात आलेल्या लाऊडस्पिकरची माहिती गोळा करण्यात येत आहे.