२ एकर शेतीत काय काय होणार? दवाखान्याला पैसे पुरेना; कर्जबाजारीपणाला कंटाळून पती - पत्नीची आत्महत्या; नांदुरा तालुक्यातील हृदयद्रावक घटना

 
jyhgh
नांदुरा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २ एकर शेती, त्यातही उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ नाही. आधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ तर कधी रोगराई..उत्पादन घेण्यासाठी लागणारा खर्चच मोठा. त्यातही ६ ते ७ जणांचे कुटुंब..२ एकर शेतीत कस भागणार हे? असा प्रश्न त्या दोघांना पडला..आयुष्यभर दोघांनी एकमेकांच्या साथीने संसाराचा गाडा कष्टाने चालवला मात्र आयुष्याच्या संध्याकाळी संकटांनी त्रस्त झाल्याने संसाराचा शेवटही त्यांनी सोबतच केला. नांदुरा तालुक्यातील बेलुरा गावात मन हेलावून टाकणारी,हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे.

कर्जबाजारी पणाला कंटाळून पती पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. वसंत जगदेव डामरे (७०) आणि सरलाबई वसंत डामरे (६५) असे आत्महत्या करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. २ एकर शेतीच्या भवश्यावर हे कुटुंब संसाराचा गाडा ओढत होते. गेल्या काही दिवसांपासून सरलाबाई आजारी असल्याने त्यांच्या दवाखान्यासाठी मोठा खर्च झाला. घरखर्च, दवाखाना या कामासाठी बँकेचे कर्ज व इतर बाहेरचे खाजगी कर्ज कुटुंबावर होते. सरलाबाईंच्या दवाखान्यासाठी आणखी खर्च लागणार होता. आणखी पैसे आणायचे कुठून ? या विवंचनेत ते होते. त्यामुळे दोघांनी रात्रीच मोनोसिल नावाचे औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . बोराखेडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.