काय राव लोकांना काही कळत नाही का..! मुले चोरणारी महिला समजून बिचाऱ्या तृतीपंथीयाला बेदम बदडले! सोशल मीडियावर व्हिडिओ केला व्हायरल! जळगाव जामोदची घटना

 
iuhi
जळगाव जामोद( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एका अल्पवयीन मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न शनिवारी संग्रामपूरात झाला होता. मात्र महिलेच्या हाताला चावा घेत त्या मुलीने स्वतःची सुटका करून घेतली होती. दरम्यान मुले चोरणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच जळगाव जामोद येथील जुन्या बसस्थानक परिसरात मुले चोरणारी महिला असल्याच्या संशयावरून एका बिचाऱ्या निष्पाप तृतीयपंथीयाला लोकांनी बेदम बदडले. त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.  मात्र पोलीस चौकशी अंती ज्याला मारहाण झाली तो तृतीयपंथी निष्पाप असल्याचे समोर आल्यानंतर मारहाण करणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काल, सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

जळगाव जामोद शहरातील नगर परिषद शाळा क्र ३ समोर एका १२ वर्षीय मुलाने तृतीपंथीयाने त्याला चॉकलेट देऊन हात पकडल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यामुळे ती मुले चोरणारी महिला असावी असा संशय मुलाच्या कुटुंबीयांना आला. दरम्यान तो पर्यंत तृतीयपंथी  एस टी बस स्टँड जवळ आला. शेगावला जाण्यासाठी त्याने रिक्षा केली.

ऑटो रिक्षा जुन्या बसस्टँडवर आल्यावर ऑटोचालक पान खाण्यासाठी खाली उतरला. त्याचवेळी तो मुलगा तिथे कुटुंबीयांसोबत तिथे पोहोचला. ऑटोत बसलेल्यानेच माझा हात धरल्याचे त्याने सांगितले. यावेळी तिथे उपस्थित काहींनी कुठलीही शहानिशा न करता त्या तृतीयपांथियाला बेदम मारहाण केली. 

 त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्याला पोलीस ठाण्यात नेले. तिथे चौकशी अंती मुले चोरणाऱ्या टोळीशी त्या तृतीयपंथीयांचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले. अखेर मारहाण करणाऱ्या ५ जणांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. केवळ संशयावरून कुणाला मारहाण करू नका, माहिती पोलिसांना द्या असे आवाहन जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केले आहे.