दुर्दैवी! मुलीच्या लग्नाचे टेन्शन; शेतकऱ्याने घेतला गळफास! मलकापूर तालुक्यातील घटना

 
kraim
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढत आहेत. यंदा अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. त्यापाठोपाठ सोयाबीन ,कापसाला सुद्धा मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आहे. मलकापूर तालुक्यातील देवधबा येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक अडचणीला कंटाळून आत्महत्या केली.

सोपान निना घोंगे (५२, रा देवधाबा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते नापिकीमुळे आर्थिक अडचणीत होते. त्यातच मुलांचे शिक्षण , मुलींचे लग्न करण्याकरिता पैसे जमवण्याची अडचण त्यांना सतावत होती. यंदा अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. पिकांना भाव नाही यामुळे अडचणी वाढत गेल्या. या विवंचनेत  त्यांनी घरी कुणी नसल्याचे पाहत गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी शेतातून घरी आल्यानंतर ही बाब पत्नीच्या निदर्शनास आली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.