चिखलीत रूम करून राहणाऱ्या दोन तरुणी गायब!; मैत्रिणीच्या लग्नाला गेल्याचे सांगितले, अद्याप पत्ता नाही...!!, लोणार तालुक्यातही मुलीचे अपहरण

 
देऊळघाटच्या अल्पवयीन मुलीचे धाडच्या तरुणाने केले अपहरण!
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीच्या राऊतवाडीत रूम करून राहणाऱ्या दोन तरुणींचे अपहरण झाले आहे. मैत्रिणीच्या लग्नाला जातोय म्‍हणून दोघी गायब झाल्या. प्रत्यक्षात लग्नात पोहोचल्याच नाहीत. २४ एप्रिलपासून आज, २८ एप्रिलपर्यंत या मुलींचा शोध लागलेला नाही. अखेर त्‍यातील एकीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली आहे.

एका ३६ वर्षीय महिलेची आयटीआयमध्ये शिकणारी मुलगी राऊतवाडीत रूम करून राहत होती. तिच्यासोबत एक १८ वर्षीय मुलगीसुद्धा राहत होती.महिलेच्या मुलीने २४ एप्रिलला सकाळी कॉल करून मैत्रिणीच्या लग्नाला दोघी जात असल्याचे सांगितले. २५ एप्रिलला दुपारी परत आईने फोन करून लग्नावरून आल्या का, असे विचारले असता तिने अजून लग्नातच असून मंगळवारी येतो, असे सांगितले.

२६ एप्रिलला मुलीला फोन केले असता तिने उचलला नाही. नंतर तिचा मोबाइल बंद आला. त्‍यामुळे घाबरून गेलेल्या आईने तिची रूम गाठली असता घरमालकाने दोघीही रूमवर आल्या नसल्याचे सांगितले. लग्नालाही त्‍या आल्या नसल्याचे लग्नघरून सांगण्यात आले. रूममेट असलेली तरुणीही तिच्यासोबत गायब असल्याने तिच्या घरी चौकशी केली असता तीसुद्धा घरी आली नसल्याचे समोर आले. त्‍यांच्या एका मैत्रिणीने व्हिडिओ कॉल केला असता दोघी सोबतच असल्याचे सांगितले. आजपर्यंत वाट पाहूनही त्‍या न परतल्याने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

लोणार तालुक्यातूनही मुलीचे अपहरण
लोणार तालुक्‍यातील नांद्रा येथील एका १७ वर्षीय मुलीचे २६ एप्रिलला अपहरण झाले आहे. तिचे आई- वडील मजुरीसाठी नगरला गेले होते. त्‍यांना मुलगी घरी नसल्याचे कळल्यावर त्‍यांनी गावात येऊन शोध घेतला. मात्र ती अद्याप मिळून आली नाही. अखेर लोणार पोलीस ठाण्यात तिच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार दिली आहे.