अंघोळीसाठी नदीवर गेलेले दोघे बुडाले! एकाचा मृत्यू! शेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

 
duble
शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मित्रांसोबत नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शेगाव तालुक्यातील नागझरी येथील मन नदीवर काल, २५ ऑगस्टच्या सायंकाळी ही घटना घडली. राम प्रभाकर अंजनकर (२१, रा. आळसणा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम त्याच्या शेगावच्या पंचशील नगरातील आदित्य आणि छोट्या या दोन मित्रांसोबत मन नदीपात्रात अंघोळीला गेला होता. राम त्याचा मित्र आदित्य सोबत पाण्यात उतरला. मात्र दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.

तेथील मच्छीमारांच्या ध्यानात ही बाब आल्यावर त्यांनी तातडीने दोघांना बाहेर काढले. दोघांना शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र दोघांपैकी राम अंजनकर याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असून आदित्यवर उपचार सुरू आहेत.