अपहरण करून दोन चुलत बहिणींवर बलात्कार! जळगाव जामोद तालुक्यातील घटना

 
rape
जळगाव जामोद ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दोन चुलत अल्पवयीन बहिणींना लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. नंतर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी दोन संशयितांना मध्यप्रदेशातील खंडवा येथून अटक केली असून, न्यायालयाने संशयितांना ८ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जळगाव जामोद तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे वडील  जळगाव जामोद शहरातील कॉम्प्लेसमध्ये वॉचमन म्हणून काम करतात. त्यांची मुलगी आईसोबत काकाच्या घरी राहत होती. १४ वर्षीय मुलीच्या काकाला सुध्दा १३ वर्षाची मुलगी आहे. दरम्यान १४ वर्षीय मुलीला खामगाव तालुक्यातील भास्तन येथील प्रेम पाटील याने  व १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला नांदुरा येथील मनोज शिंगोटे याने १२ एप्रिलपूर्वी लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते. त्यामुळे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. अंबुलकर यांच्या मार्गदर्शखाली पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे  करत होत्या.

दरम्यान पोलिसांनी शोध घेतला असता दोघेही अल्पवयीन मुलीला घेऊन मध्यप्रदेश येथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे  ठाणेदार अंबुलकर यांनी पोलीस उपनिरीक्षक रंजना आवारे, नापोकॉ सुशीर व पोकाँ सोळंके यांचे एक पथक तयार करून मध्यप्रदेश इंदोर येथे पाठवले. २५एप्रिल रोजी संशयितांचा खंडवा येथील  मित्र चैनसिंग डावर याच्या घरी जाऊन पोलिसांनी पाहणी केली असता त्याच्या घरी प्रेम पाटील व मनोज शिंगोटे हे दोघेही अल्पवयीन मुलींसोबत दिसून आले.

पोलिसांनी  दोघांना अटक करून व दोन्ही अल्पवयीन मुलींची संशयितांच्या ताब्यातून सुटका केली. अल्पवयीन मुलींची चौकशी केली असता प्रेम पाटील व मनोज शिंगोटे या दोघांनी लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.  त्यामुळे पोलिसांनी दोघांविरुद्ध अपहरणासह बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना  न्यायालयाने ८ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.