ट्रॅव्हलने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धास चिरडले; लोकांनी चालकाला धो धो धुतले; शेगावातील घटना...

 
htfy
शेगाव( सोनु मोहोड: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅव्हलने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धास चिरडल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. यावेळी संतप्त जमावाने ट्रॅव्हल चालवणाऱ्या चालकाला बेदम चोप दिला. आज, ३ नोव्हेंबरला सकाळी  शेगावतील श्री. संत गजानन महाराज चित्रकला महाविद्यालय चौकात हा अपघात झाला.

प्राप्त माहितीनुसार हरिचंद्र पांडुरंग लांडे (८५,रा.धनेगाव, ता.बाळापूर, हल्ली मुक्काम वारकरी नगर शेगाव) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते रस्ता ओलांडत असताना खामगाव कडून आलेल्या व बाळापूर मार्गाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ने त्यांना उडवले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान अपघातानंतर ट्रॅव्हल चालकाला स्थानिकांनी चोप दिला. मात्र पोलीसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत ट्रॅव्हलस व चालकाला ताब्यात घेतले. याबाबत वारकरी नगरातील शेषराव विष्णू शिंगणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुभाष वाघोदे करीत आहेत.