दहा दिवसांत तिघे देवाघरी! चिखली तालुक्यातील "या" गावात विपरीतच घडत! एकाचे निधन झाले की महिन्याभरात तिघांचा नंबर लागतोच म्हणून समजा..! गावकरी म्हणतात, कुणाची नजर लागली काय माहित..

 
fgfdh
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी  गाव.. गाव तस चांगलच..गावातले लोकही धार्मिक, सुशिक्षित अन् शेतात घाम गाळून मेहनतीचे खाणारे..मात्र गेल्या काही वर्षांपासून या गावाला कुणाची नजर लागलीय देव जाणो..गावात एखाद्याचे निधन झाले की महिन्याभरात दोघा - तिघांचा नंबर लागल्याशिवाय राहत नाही. आता अलीकडेच केवळ १० दिवसांत तीन उमद्या युवकांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे..

१० दिवसांआधी धोत्रा भणगोजी येथील गणेश भाऊसाहेब इंगळे या शेतकऱ्याने आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. ह्या दुःखातून सावरत नाही तोच  १३ जून रोजी महादेव सखाराम इंगळे(३५) या युवकाचा ब्रेन हॅमरेज मुळे मृत्यू झाला. महादेव हा भाजीपाल्याचा व्यवसाय करीत होता. चिखली येथील हराशीमधून भाजीपाला खरेदी करीत असताना त्याला अचानक चक्कर आली. त्याला तातडीने चिखली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने औरंगाबाद रेफर करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान महादेवचा मृत्यू झाला. अतिशय होतकरू असलेल्या महादेवाच्या मृत्यूची वार्ता कळताच गावकऱ्यांना धक्का बसला. त्याच्यावर रात्री अंत्यसंस्कार होताच दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल रवींद्र गंडे (३५) या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. विशालवर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकराला अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

गावाचा इतिहासच तसा...
दरम्यान गेल्या काही वर्षांपासून या गावात सातत्याने अशा घटना घडत असल्याचे गावकरी सांगतात. एखाद्या वृद्धाचे निधन झाले की आता पुढचा नंबर कुणाचा अशी चर्चा होत असते. एकाचे निधन झाले की पुढच्या तीस दिवसांत दोघांचे किंवा तिघांचे निधन होतेच असे गावकरी सांगतात. अलीकडे दहा दिवसांत तिघांचा मृत्यू झाल्याने या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे.