याला म्हणतात हिम्मत! दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडले! शिरपुरची घटना! बुलडाणा तालुक्यातल्या साखळीचे आहेत चोरटे

 
raypur
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्यात. काही गावांत तर युवकांनी वेगवेगळे पथक नेमून गावाच्या रक्षणाची जबाबदारी उचलली आहे. दरम्यान बुलडाणा तालुक्यातील शिरपूर येथे काल रात्री दोन चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. शिरपूर येथील एका शेतकऱ्याची इलेक्ट्रिक मोटार चोरण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.

दोन्ही चोरटे हे बुलडाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथील रहिवासी असून रायपूर पोलीस ठाण्यात आज, २६ सप्टेंबर रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शे. आरमान शे.सिकंदर (१९) व सय्यद परवेझ सय्यद बब्बु (२५) अशी दोघांची नावे आहेत.

 शिरपूर येथील भास्कर रोडूबा शेळके व पंढरी शिवाजी शेळके दोघे शेतात झोपायला गेले होते. दरम्यान  रात्री १० च्या सुमारास भास्कर शेळके यांच्या मळणी यंत्रावरील मोटार दोन अज्ञात इसम चोरून नेत असल्याचे त्यांना दिसले.त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली असता चोरटे तेथून पळाले. मात्र शेतकऱ्यांनी पाठलाग करून दोघांनाच पकडले. त्यांची चौकशी केल्यावर ते साखळी बु येथील असल्याचे समोर आले. त्याचवेळी मळणी यंत्रावरील इलेक्ट्रिक मोटरचे नट बोल्ट काढलेले असल्याने ती चोरून नेण्याचा प्रयत्नच त्या दोघांनी केल्याचे समोर आले. दोघा चोरट्यांना रायपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.