पेन्शन काढण्यासाठी चोरट्यांचे टेन्शन! एटीएम अदलाबदली करून सेवानिवृत्ताला फसविले; जानेफळ पोलिसांनी भामट्याला पकडले

 
Rrgh
जानेफळ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चोरट्यांचे धाडस एवढे वाढले की, चोरी करण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी ते मागेपुढे पाहत नाहीत. स्विफ्ट कार घेऊन आलेल्या दोन चोरट्यांनी जानेफळ येथील स्टेट बँक शाखेत हात चलाखीने एटीएमची अदलाबदली करून एका सेवानिवृत्ताला गंडविले. परंतु पोलिसांच्या सजग तपासामुळे दोन्ही चोरटे पकडल्या गेले आहे. हा फसवणुकीचा प्रकार १३ जानेवारीला समोर आला. बिरबल कुमार प्रदीप कुमार राम (२१) रा. परमाणपुर उत्तर प्रदेश, सुनील सखाराम जाधव (२६) रा.उल्हासनगर कल्याण अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

उटी येथील बाबू सिंग दासू राठोड हे सेवानिवृत्त गृहस्थ स्टेट बँक शाखा जानेफळ येथे सेवानिवृत्तीची पेन्शन जमा झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी बँकेत गेले होते. रक्कम असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी एटीएम मधून कार्ड टाकून ५ हजार रुपये काढले. दरम्यान याकडे दोन चोरट्यांनी पाळत ठेवली होती. एकाने गृहस्था सोबत संवाद साधत त्यांना बोलण्यात गुंतविले तर दुसऱ्याने एटीएम मधून कार्ड काढून देण्यात मदत करत असताना हात चलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदली करून टाकले.

बँकेबाहेर गृहस्थ पडले असता, त्यांना खात्यातून आणखी ६ हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज प्राप्त झाला. एटीएम कार्ड बदलल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान त्यांनी ते दोन्ही चोरटे एका स्विफ्ट कारने मेहकरकडे जाताना पाहिले होते. त्या गाडीचा नंबर देखील त्यांनी पाहिला. यासंदर्भात गृहस्थांनी पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चक्र फिरविले.जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राहुल गोंदे त्यांनी तात्काळ एका पथकाला रवाना केले. सीसीटीव्हीच्या आधाराने अमडापूर ते जानेफळ रोडवर या पथकाने चोरट्यांचा पाठलाग करून दोन्ही चोरट्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून २ मोबाईल, नगदी रक्कम, स्विफ्ट डिझायर गाडीसह २ बोगस एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहे.