गणपती बुडवायला गेलेला तरुण खडकपूर्णात बुडाला! देऊळगावराजा तालुक्यातील घटना

 
hbh
देऊळगावराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनासाठी गेलेल्या  देऊगांव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथील सतरा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सिनगांव जहांगीर हे गाव बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा खडकपूर्णा प्रकल्पाच्या  प्रवण क्षेत्रात येते मृतक युवक बळीराम विनायक बोबडे वय (१७)  हा त्याचे मित्र भरत वलगरे ,अजय डोईफोडे, अक्षय डोईफोडे ,पवन बोबडे आदी मित्रा समवेत सायंकाळी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गावाशेजारील असलेल्या नदीवर गेले होते.गणपती विसर्जन करीत असताना  बळीराम बोबडे याचा पाय घसरून नदीमध्ये पडला. सोबतच्या मित्रांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते त्याला वाचवण्यात अपयशी ठरले.या घटनेमुळे घटनास्थळी एकच आक्रोश सुरु झाला होता.

देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. सरपंच प्रकाश गिते आणि गावातील ५० ते ६० गावकऱ्यांच्या साह्याने रात्रीची वेळ असल्याने बॅटऱ्या लावून शोध घेतला, परंतु सदर नदी आणि खडकपूर्णा धरणाचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात असल्याने  बळीरामचा शोध लागला नाही. आज ,१० सप्टेंबरच्या सकाळी गावकऱ्यांनी गळाच्या साह्याने शोध मोहीम राबविले. त्यामध्ये सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान बळीरामचा  मृतदेह सापडला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे पाठवण्यात आला.  देउळगावराजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.