बायकोच्या चारित्र्यावर संशय घेतला अन संसाराचा बट्ट्याबोळ झाला! मेहकर तालुक्यातील पाथर्डी गावची घटना

 
kraim
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चारित्र्याचा संशय घेतल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत.  मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथे सुद्धा असाच प्रकार समोर आला असून १० वर्षांचा सुखी संसार एका कारणामुळे तुटेपर्यंत ताणल्या गेलाय. चारित्र्यावर संशय घेऊन बायकोला मारहाण करणाऱ्या नवऱ्याविरुद्ध माहेरी गेलेल्या बायकोने बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संशयी नवऱ्यासह  सासू सासऱ्यासह नणंदे विरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

मोताळा तालुक्यातील खडकी येथे माहेरी आलेल्या सोनाली नितेश राठोड(३५) यांनी याप्रकरणाची तक्रार दिली आहे.  १० वर्षांपूर्वी त्यांचे लग्न मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथील नितेश राठोड याच्याशी झाले होते.  लग्नानंतर त्यांना २ मुली व १ मुलगा असे तीन अपत्य झाले. सगळा संसार सुखाचा सुरू असताना दुधात मिठाचा खडा पडावा तसे त्यांच्या संसारात वादळ आले. 

गेल्यावर्षीच्या जून महिन्यापासून नितेश बायकोच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. १० जून २०२१ रोजी नितेश ने चारित्र्याच्या संशयावरून बायकोला बेदम मारहाण केली. सासू सासरे व नणंद नितेश ला त्याच्या बायकोविरुद्ध भडकावून देत असल्याचा आरोप  सोनाली यांनी तक्रारीत केला आहे. तुझ्या वडिलांकडून ४० हजार रुपये आण तोपर्यंत मी तुला वागवत नाही असे म्हणत सोनाली ला घराबाहेर हाकलून लावले. अनेकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही नितेश वर कोणताही फरक पडला नाही. अखेर वैतागलेल्या विवाहितेने बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.