झोपेतच अख्ख्या कुटुंबाचा गेम करण्याचा प्रयत्न! घर दिले पेटवून! चिखली तालुक्यातील खळबळजनक घटना

 
aag
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  घर पेटवून देऊन अख्खे कुटुंब संपवण्याचा डाव अज्ञात लोकांनी रचला. मात्र सुदैवाने जाग आल्याने आरडाओरड केल्यानंतर शेजारचे लोक धावून आल्यानंतर त्यांनी आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. चिखली तालुक्यातील धानोरी येथे काल, २८ जुलैच्या रात्री ही घटना घडली. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

इंदुबाई धोंडू भांडवले(६०, रा धानोरी) यांनी याप्रकरणाची तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार त्या गावात पती व मुलीसह शासकीय योजनेतून मिळालेल्या घरकुलामध्ये राहतात. रात्री जेवण करून झोपल्यानंतर त्यांना अचानक जाग आली. त्यावेळी स्वयंपाक खोलीत व शेळी बांधायच्या गोठ्याला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावत आले. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पाणी टाकून आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. आग कुणी आणि का लावली हे मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.