तीन महिलांना घेऊन जाणारा ऑटो अडवून दोघांनी केले चुकीचे काम..! खामगावातील धक्कादायक घटना
Thu, 15 Dec 2022

खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तीन महिलांना घेवून जाणारा ऑटो अडवून एका महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपये किंमतीची सोन्याची पोथ दोन लुटारूंनी लंपास केल्याची घटना १२ डिसेंबरच्या दुपारी जलंब नाका परिसरात घडली. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एवढी हिम्मत चोरट्यांची होते तरी कशी असा सवालही उपस्थित होत आहे.
नाशिक येथील सौ.सरिता सागर बोंडे वय ५३ वर्ष ह्या कामानिमित्त खामगाव येथे त्यांची बहीण सौ. अरुणा शिवाजीराव टाले रा. कावडकर हॉस्पिटलजवळ (खामगाव) येथे आल्या होत्या.दरम्यान त्या दुपारी साहित्य खरेदीसाठी दोन बहिणींना घेवून बाजारपेठत निघाल्या. शहरात जाण्यासाठी त्या तिघी ऑटोत बसल्या. यावेळी तोंडाला, काळे मास्क लावलेले दोघे भामटे एका दुचाकीने आले.
त्यांनी जलंब नाक्याजवळ ऑटो अडवून सौ. सरिता बोंडे यांच्या गळयातील सोन्याची पोत हिसकावून घेतली व ते दोघे दुचाकीने पळून गेले. ऑटो चालकाने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण ते दोघे हाती लागले नाही. भरदिवसा झालेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सौ. बोंडे यांनी खामगाव शहर पोस्टेला तक्रार दिली असून याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात लुटारू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.