काळ आला होता,पण वेळ आली नव्हती! मोठा अनर्थ टळला;तब्बल २० जण बचावले! पिंपळगाव सराई जवळील घटना

 
yufuy
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काळरुपी यमराज समोर ठाकल्याने घरगुती कार्यक्रम आटोपल्याचा आनंद क्षणार्धात दुःखात बदलत होता. परंतु सुदैवाने तब्बल २० जण मृत्यूच्या दाढेतून परतले. त्यामुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावे लागेल. तुम्ही म्हणाल हे कुठल्या घटनेबाबत बोलता? तर जाणून घ्या..

झाले असे की,घरगुती कार्यक्रम आटपून आपापल्या गावाकडे परतणाऱ्या दोन वाहनाचा अपघात होऊन २० जण जखमी झाले. ही घटना आज पिंपळगाव सराई नजीकच्या भारज चौफुलीवर घडली. 
बुलडाणा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष अशोक गव्हाणे यांच्या परिवारातील सदस्य भारज येथून आपल्या गावी शिरपूरकडे ईर्टिगा कार ने घराकडे परत जात होते. परंतु बुलडाणा जिल्हयातील पिंपळगाव सराई येथुन जवळ असलेल्या भारज चौफुलीवर त्याच्या मालवाहू टाटा मॅजिक आणि ईर्टिगा कार मध्ये समोरासमोर धडक झाली.

यात दोन्ही वाहनातील जवळपास २० जण जखमी झाले. टाटा मॅजिकमधील १४ जण हिसोडा येथून आपल्या गावी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांग्री नवघरे कडे परत जात होते. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असून अपघातातील जखमींना बुलडाणा तर काहींना चिखली येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती रायपूर पोलिसांनी मिळाली. नशीब बलवत्तर असल्याने या अपघातात जीवित हानी झाली नाही.