चिखली -मेहकर रस्त्यावर पुन्हा अपहरण नाट्याचा थरार.! माझ्या ३ वर्षांच्या चिमुकल्याला पळवले हो,शेतात जाणाऱ्या महिलेचा आक्रोश! खरे समोर आल्यावर सगळ्यांनी लावला कपाळाला हात..

तर त्याचे झाले असे की, मोहखेड येथील एक महिला ३ वर्षांच्या मुलाला व ५ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन शेतात जात होती. मुले महिलेच्या मागे मागे येत होती. लव्हाळा ते पिंपळगाव उंडा दरम्यान मुख्य रस्त्याच्या खाली उतरून महिला शेतरस्त्याने जात होती. काही वेळाने महिलेने मागे वळून बघितले असता ३ वर्षांचा मुलगा दिसला नाही. त्यामुळे महिलेने मुलाचा शोध घेतला, महिला ओरडत ओरडत पुन्हा चिखली - मेहकर या मुख्य रस्त्यावर आली आणि आक्रोश करत रडू लागली.
महिलेचा आक्रोश पाहून रस्त्यावरील येणारे जाणारे लोकही थांबले. आपल्या मुलाला कुणीतरी मोटारसायकलवर बसवून मेहकर कडे घेऊन गेले असे सांगत ती रडत होती. याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. विलंब न करता पोलीस तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले.
अन् कपाळावर हात मारून घेण्याची वेळ..
दरम्यान काही वेळातच लव्हाळा गावचे सरपंच दिनकर कंकाळ यांचे वडील मधुकर कंकाळ हे त्या ३ वर्षांच्या मुलाला स्कूटीवर घेऊन जिथे जमाव जमला होता तिथे पोहचले. हा मुलगा रस्ता चुकून आमच्या शेतात आला होता. मी गवत कापत होतो,तिथे हा मुलगा रडत होता. त्यामुळे मी त्याला घेऊन आलो असे त्यांनी सांगितले हे ऐकताच उपस्थित सगळ्यांनाच कपाळाला हात लावायची पाळी आली..
ठाणेदार जितेंद्र आडोळे म्हणतात..
मुले पळवणारी कोणतीही टोळी नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कदाचित या घटनेत हा मुलगा शेतातील लांडगा, कोल्हा, बिबट्या सारख्या हिंसक प्राण्याच्या तावडीत सापडला असता तर मुलाचे अवयव चोरट्यांनी काढून नेले अशीही आरोळी उठली असती. नागरिकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अनोळखी लोकांना केवळ संशयावरून मारहाण करू नये.