अपघाताची मालिका थांबेना! भरधाव बोलेरो ने उडवल्याने वर्षारंभीच बालक ठार! बिबी येथील घटना; जिल्ह्यात सरत्या वर्षात ५२७ अपघातात ३०७ जण देवाघरी

 
gyjh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्ह्यात सरत्या वर्षातील ११ महिन्यात जिल्ह्यातील विविध मार्गांवर ५२७ अपघात झाले. यात ३०७ जण बळी ठरले. नववर्षात तरी, अपघातांची मालिका थांबेल अशी अपेक्षा आहे.परंतु  वर्षारंभीच एका बोलेरो वाहनाने एका १४ वर्षीय बालकाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी समोर आली आहे.अपघात बीबी ते दुसरबीड मार्गावरील धाईत यांच्या शेताजवळ झालाय. राजरत्न संजय साळवे (१४, रा.बीबी) असे मृतक बालकाचे नाव आहे.

 २०२२ या वर्षाने कुठे ना कुठे अपघाताच्या अस्वस्थ वार्ता दिल्या. जवळपास ११ महिन्यात ५२७ बुलडाणा जिल्ह्यातील विविध मार्गांवर अपघात झालेत.
झालेल्या अपघातात ३०७ जण मृत्युमुखी पडले. तर २७४ जखमी झाल्याची आकडेवारी आहे. २०२३ या नववर्षाचा दिवस उजाडला नाही तोच, बीबी ते दुसरबीड मार्गावर एका अपघातात एका बालकाला आपले प्राण गमवावे लागले आहे. आज रविवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान हा अपघात झाला. एम एच २० बी डी ७७०७ या क्रमांकाच्या बोलेरो वाहन चालकाने राजरत्न संजय साळवे या बालकाला धडक दिली.

सदर बालक आपल्या मित्रांसोबत एका शेतामध्ये आला होता. तो रस्त्यावरून जात असताना त्याला वाहनाची जबर धडक बसली. या अपघातात बालक जखमी झाल्याने त्याला बीबी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान बोलेरो चालक शाहरुख हसन चौधरी (रा.हिवराखंड ता. लोणार) याच्या विरुद्ध गाडी निष्काळजीपणे चालवून धडक दिल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बीबी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण, पोलीस नाईक विष्णू जायभाये, पोलीस नाईक रोहिदास पांढरे  करीत आहे.