परतीच्या पावसाने शेतकरी खचला! सोयाबीनच्या सुडीत घुसले होते पाणी; गळफास घेऊन संपवले जीवन; चांडोळ येथील घटना...

 
sdgf
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): परतीच्या पावसाने यंदा जिल्ह्यात धुमाकूळ घातला. सोयाबीन, कापसाचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली. त्यातच मालाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. या संकटाने खचलेल्या चांडोळ ( ता.बुलडाणा) येथील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. भुजंगराव जंजाळ(६३) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार भुजंगराव जंजाळ यांनी राहत्या घरात लोखंडी अँगलला गळफास घेतला. धाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. जंजाळ यांच्या शेतीचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. त्यांच्या सोयाबीनच्या सुडीत पाणी घुसल्याने झालेल्या नुकसानीमुळे ते खचले होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्या पश्यात तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.