नात्याला काळीमा! चिखलीत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर काकाचा बलात्कार; शाळेसमोरून गाडीवर बसवले अन्...

पिडीत मुलगी चिखली शहरातील गजानन नगर भागात राहते. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार १ सप्टेंबर २०२२ ते २३ जानेवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपी हा नात्याने मुलीचा काका असल्याने त्या ओळखीचा गैरफायदा आरोपीने घेतला. ओळखीतून जवळीक वाढवून तो अनेकदा मुलीला भेटायला चिखलीत मुलीच्या घरी यायचा, मात्र नातेवाईक असल्याने कुणाला संशय यायचा प्रश्नच नव्हता. दरम्यान एक दिवस आरोपी काकाने मुलीला मोटारसायकल वर बसवून बुलडाणा येथे नेले.
तिथे एका लॉजवर मुलीला नेत तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास बदनामीची धमकी त्याने मुलीला दिली. त्यामुळे बदनामीच्या भीतीने मुलीने घडला प्रकार कुणाला सांगितला नाही. २३ जानेवारीच्या संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आरोपी काका मुलीच्या शाळेसमोर आला. त्याने मुलीला गाडीवर बसवून बाजूला नेत ओढणी काढून मुलीला जवळ ओढले असेही मुलीने तक्रारीत म्हटले आहे. अखेर घडला प्रकार मुलीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून आरोपी विरुद्ध बलात्कार, पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी ठाणेदार विलास पाटील यांनी तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक धनजंय इंगळे यांच्या हाती देत वेगवान तपासाच्या सूचना दिल्या. काल,२६ जानेवारी रोजी आरोपीला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून ताब्यात घेत त्याला अटक करण्यात आली. आज, २७ जानेवारीला आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे यांनी सांगितले.