तूरीची गंजी जाळली ! अडीच लाखांचा धूर! विर पांगरा येथील रात्रीची घटना ; जिल्ह्यात आगलावे कमी होईनात

 
hgfgh

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  ग्रामीण भागात शेतमालाच्या गंजीला आग लावण्याचे प्रकार घडत आहेत. बीबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विर पांगरा येथे काल रात्री २ वाजता अडीच ते तीन एकरातील तुरीची गंजी जाळून टाकल्याची घटना समोर आली. त्यामुळे शेतकरी विठोबा तुकाराम जायभाये यांचे अंदाजीत २ ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतमाल जळण्याच्या घटना वाढत आहेत.आधीच अस्मानी व सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आलाय.
अशा बिकट परिस्थितीत शेतकरी  पीक उत्पादन घेण्यासाठी जीवाचे रान करतोय. शेतात कापणीनंतर साठवून ठेवलेल्या शेतमालाच्या गंजीला आग लावली जात आहे.

अज्ञातांकडून घडणाऱ्या या प्रकारामुळे लाखो रुपयांची झळ शेतकऱ्यांना बसत आहे. काल रात्री शेतकरी विठोबा तुकाराम जायभाये त्यांच्या अडीच एकरातील तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने पेटवून दिले. दरम्यान तुर जळाल्याने अंदाजीत २ ते अडीच लाख  रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी पुत्र योगेश जायभाये म्हणाले आहेत. शिवाय बीबी पोलीस ठाणे हद्दीत अशा घटना घडल्या असून, कारवाई केल्या जात नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. सदर प्रकरणी नवनियुक्त ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी अज्ञात आरोपीचा शोध घेऊन न्याय मिळवून द्यावा, अन्यथा पोलीस ठाण्यावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला.