चिखलीत उभ्याने कापून टाकण्याची भाषा! चिखलीच्या कुंभारवाडयातील घटना

 
chikhlipolis
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या कुंभारवाड्यात दोन जिगरी मित्रात राडा झाला. दारू प्यायला सोबत येत नाही म्हणून एकाने दुसऱ्याला उभ्याने कापून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप बलराम पेंढारकर (३५, रा कुंभारवाडा, चिखली)  यांनी याप्रकरणाची तक्रार दिली आहे. संदीप पेंढारकर हे मुर्तीकाम करतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मागील सहा महिन्यांपासून त्यांनी दारू सोडलेली आहे. २७ सप्टेंबरच्या रात्री साडेसातच्या दरम्यान ते त्यांच्या मित्रांसोबत घराजवळ बसलेले होते. त्याचवेळी पुण्याहून आलेला त्यांचा मित्र सुरेश भिसे हा जबरदस्तीने पेंढारकर यांच्या घरात घुसला व त्यांना माझ्यासोबत दारू प्यायला चाल असे म्हणू लागला.

त्यावर पेंढारकर यांनी नकार दिल्याने भिसे याने त्यांना अश्लील शिवीगाळ केली. घरातील मूर्ती बनवण्याच्या साहित्याची फेकझोक केली. त्यानंतर  तुला उभ्याने कापून टाकीन असे म्हणत पेंढारकर यांना मारहाण केली.  शेवटी तिथे उपस्थित असलेल्यांनी हे भांडण सोडवले. याप्रकरणी पेंढारकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सुरेश भिसे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.