पतीने घेतला पाळण्याच्या दोरीने गळफास !दीड वर्षाच्या चिमुरडीचे पितृछत्र हरविले

 
iuy

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथील राऊतवाडी परिसरात भाड्याच्या खोलीत पत्नी व दीड वर्षाच्या मुली सोबत राहणाऱ्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.विष्णू संजय चिंचोले, चिखली असे मृतकाचे नाव आहे.

पोलीस सूत्रानुसार, विष्णू संजय चिंचोले (२८ वर्ष) हे मागील सहा सात महिन्यांपासून पत्नी व दीड वर्षाच्या मुलीसोबत चिखली येथे राऊतवाडी परिसरात घर भाड्याने घेऊन राहत होते. मूळचे मालगणी येथे राहणारे विष्णू यांच्याजवळ एक ते दीड एकर शेती आहे.आधी चिखली ते मालगणी असा रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करायचे. परंतु रिक्षा चालवून घर चालत नसल्या कारणाने ते चिखली येथील एका रेडिमेड कापडाच्या दुकानात सहा महिन्यांपूर्वी कामावर रुजू होते. याच कारणाने ते चिखली येथे पत्नी व मुलीसोबत राहण्यास आले होते.

नातेवाईकांकडून प्राप्त माहितीनुसार, १९ डिसेंबर रोजी चिखलीचा बाजाराचा दिवस असल्याने त्यांची पत्नी मुलीला घेऊन बाजार आणण्यासाठी बाहेर गेलेली होती. घरी कोणीच नसतांना दुपारी पाच साडे पाच दरम्यान घराचा दरवाजा आतून बंद करून मुलीसाठी बांधलेल्या झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. घटनास्थळी दाखल झालेल्या चिखली पोलिसांनी पंचनामा केल्यावर मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी चिखली ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले होते. रात्री नऊ दरम्यान मालगणी गावात शोकाकुल वातावरणात त्यांचा अंत्यविधी पार पडला असून आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय? हे समजू शकलेले नाही.