किराणा दुकानदाराच्या पाठीत खंजीर खुपसला! चिखली शहरातील खळबळजनक घटना!

 
chikhlipolis
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  उधारी मागितली म्हणून किराणा दुकानदाराच्या पाठीत खंजीर खुपसुन गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना चिखली शहरात समोर आली आहे. २९ जुलैच्या दुपारी दिडला आठवडी बाजारात ही घटना घडली. या हल्यात गंभीर जखमी झालेल्या किराणा दुकानदाराच्या जबाबावरून पोलिसांनी तिघा मायलेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ऋषिकेश मदन शिंदे(२३, रा. अन्त्री कोळी, ता. चिखली) असे जखमी झालेल्या किराणा दुकानदाराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार ऋषिकेश मदन शिंदे यांचे चिखली शहरातील आठवडी बाजारात किराणा दुकान आहे. ते दुकानात काम करीत असताना चिखली येथील दिवाणी न्यायालयाजवळ राहणारे शाहरुख, त्याची आई जोवराबाई आणि शाहरुखचा मधवा भाऊ असे तिघे ऋषिकेश च्या दुकानासमोर आले.  ऋषिकेश बील बनवत असताना शाहरुखच्या मधव्या भावाने ऋषिकेशच्या पाठीत खंजीर खुपसला.

खंजीर पाठीत सोडून तिघेही पळून गेले.  त्यांनी आधी अनेकदा किराणा दुकानातून उधारीत समान नेले होते, त्याचे पैसे मागितल्याने त्यांनी हल्ला केल्याचे ऋषिकेश ने आपल्या जबाबात म्हटले आहे. ऋषिकेश वर सध्या बुलडाणा येथे उपचार सुरू असून त्याच्या जबबावरून तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.