घरासमोर सायकल लावण्याच्या कारणावरून मुलीला ७ जणांनी मिळून पाजले होते विष! आता भोगा पापाची फळ! कव्हळा येथील ७ जणांना न्यायालयाचा दणका

 
kort
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम कव्हळा येथे एका मुलीला तिच्या शेजाऱ्यांनी जबरदस्तीने जहर देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी 7 आरोपींना 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

7 फेब्रुवारी 2017 रोजी दुपारी 3 वाजता फिर्यादी शोभा कल्याणकर (25) ही आई सोबत जेवण करत होती. दरम्यान आरोपी दीपक अशोक राऊळकर, अशोक पुंजाजी राऊळकर, जिजाबाई अशोक राऊळकर, मनीषा शिवदास घन, रेखा दीपक राऊळकर, रामेश्वर देवराव राऊळकर, लक्ष्मण देवराव राऊळकर व नामदेव देवराव राऊळकर सर्व राहणार कव्हळा ता.चिखली हे सर्व आमच्या घरापुढे सायकल का लावली म्हणत  शोभा कल्याणकर यांच्या घरात घुसले. शोभा यांना दीपक अशोक राऊळकर यांनी केस धरून घराबाहेर ओढत आणले. अशोक व जिजाबाई यांनी  हात पकडून ठेवले. दीपक व मनीषा यांनी विषारी औषधाची बाटली  तोंडाला लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच रामेश्वर व नामदेव यांनी काठीने मारहाण केली. लक्ष्मण दगड फेकून मारल्याने शोभा कल्याणकर यांचे डोके फुटून जखमी झाली. अशी तक्रार दिल्याने अमडापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी 13 साक्षीदारांच्या नोंदी घेण्यात आल्या. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सोनाली सावजी यांनी प्रभावी बाजू मांडली. प्रभावी युक्तीवादामुळे न्यायालयाने 7 आरोपींना 7 वर्ष  सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी रेखा दीपक राऊळकर हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली.