चिखली तालुक्यातील "या" गावातील चौघांना भोगावी लागणार कर्माची फळे! ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

 
kort
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नाममात्र कारणावरून एका इसमावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चौघा आरोपींना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश (१) राजेंद्र मेहेर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी व ४ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.  

मागील २६ मे २०१६ रोजी मोहदरी( ता. चिखली) येथील चंद्रभान गवारगुरु याने संदीप जाधव यांच्यासोबत वाद घातला.  तंटामुक्त समितीचे  अध्यक्षांनी हे भांडण मिटवले. मात्र दुसऱ्या दिवशी संदीपचा भाऊ अमोल जाधव हा घरासमोर उभा असता अमोल गवारगुरु, गोपाल गवारगुरु, चंद्रभान गवारगुरु यांनी त्याला शिवीगाळ केली. या तिघांनी त्याचे हात धरले तर प्रदीप गवारगुरु याने अमोलच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला होता. यावेळी शेजाऱ्यांनी सुटका केल्यावर गंभीर जखमी  अमोलला आधी उंद्री,  बुलडाणा व नंतर अकोला सामान्य रुग्णालयात भरती केले. तिथे तो दहा दिवस भरती होता. 

दरम्यान अमडापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०७, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल करून तपासंती दोषारोप पत्र दाखल केले. सरकारी वकील एस .पी .हिवाळे यांचा प्रभावी युक्तिवाद, ९ जणांच्या साक्षी लक्षात धरून न्यायालयाने वरीलप्रमाणे निकाल दिला. पैरवी अधिकारी म्हणून ताठे यांनी काम पाहिले.