शेतीला लावलेला खर्चही निघत नव्हता, यंदा पेरणीला पैसे नसल्याने शेती ठोक्याने दिली! कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्याने आवळला फास!! मोताळा तालुक्यातील वडगावची धक्कादायक घटना

 
hgmmh
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोताळा तालुक्यातील वडगाव येथे काल, १७ जुलैच्या दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.  किशोर श्रीकांत शेळके(४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव  आहे.

किशोर शेळके यांच्याकडे साडेतीन एकर कोरडवाहू शेती आहे. सततची नापिकी व कर्जाचा वाढता बोजा यामुळे ते चिंतेत होते . नापीकी मुळे शेतीला लावलेला खर्चही निघत नव्हता. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करून कर्ज कसे फेडावे या चिंतेत ते होते. त्यामुळे काल, दुपारी घरात एकटेच असताना धाब्याच्या घरातील लाकडी दांड्याला त्यांनी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
    २ लाख रुपयांचे होते कर्ज

किशोर शेळके यांच्यावर बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँक शाखा मोताळा, ग्रामीण बँक शाखा मोताळा यांचे २ लाख व इतर काही लोकांचे खाजगी कर्ज होते. यावर्षी पेरणीला पैसे नसल्याने त्यांनी शेती दुसऱ्याला ठोक्याने दिली होती. त्यांच्या पश्यात पत्नी, १ मुलगा, वडील ,भाऊ असा परिवार आहे.