विजेचा तांडव सुरूच ! आणखी एक मृत्यू; सोयाबीन सोंगणाऱ्या शेतकरी दाम्पत्यावर कोसळली वीज; पती ठार, पत्नी सुदैवाने वाचली; सिंदखेडराजा तालुक्यातील देऊळगाव कोळची घटना..!

 
knkj
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात आज , ११ ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात विजेचे तांडव सुरू आहे. याआधीच्या वृत्तात बुलडाणा लाइव्ह ने जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या चार घटनेत एका शेतकऱ्यांच्या मृत्यूसह चार शेतकरी जखमी व दोन बैल दगावल्याचे म्हटले होते. दरम्यान नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सिंदखेडराजा तालुक्यातील देऊळगाव कोळ येथे घडली आहे.

देऊळगाव कोळ येथील शेतकरी खुशालराव उत्तमराव गायकवाड(५४) हे पत्नीसह शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी गेले होते. दरम्यान पाऊस कोसळणे सुरू झाल्याने ते पत्नीसह घरी जाण्यासाठी मोटारसायकल कडे धावले. त्याचवेळी वीज कोसळल्याने खुशालराव गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत त्यांच्या पत्नी थोडक्यात बचावल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यात विजा कोसळत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.