लहान मुलांवरून झालेल्या भांडणात गेला मोठ्याचा जीव; लहान मुलाने माती फेकल्यावरून बुलडाणा शहरातील इकबाल नगरात झाला होता राडा; खून करणाऱ्या तिघांना आता आयुष्यभर जेल मध्ये रहावे लागणार

 
buldana
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लहान मुलांच्या कारणावरून झालेल्या वादात बुलडाणा येथील इकबाल नगर भागात एका व्यक्तीची राफ्टरने मारून जखमी करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्नील खटी यांनी 3 आरोपींना आजीवन कारवासाची शिक्षा सुनावल्याची माहिती विशेष सरकारी वकील एस. पी. हिवाळे यांनी दिली.  शेख साबीर शेख सादीक, शेख मुजाहिद शेख सादीक व रूकैयाबी शेख सादीक सर्व रा. इकबाल नगर,बुलडाणा असे शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.

 शे. सईद शे. रहिम कुरेशी रा. इकबाल नगर बुलडाणा यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात  लेखी रिपोर्ट दिला होता की,31 ऑक्टोबर 2014 रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास तो घरी असतांना त्याच्या घराससमोर राहणारा शेख साबीर शेख सादीक रा. इकबाल नगर  हा त्यांच्याकडे आला व घराकडे पाहून शिवीगाळ करू लागला व म्हणाला की, तुमच्या मुलाने माझ्या घरासमोर माती फेकुन घराला दगड मारला, त्यावेळी फिर्यादी सईदची आई रजियाबी साबीरला समजविण्यास गेली की, लहान मुले आहे,खेळता खेळता माती फेकली असावी तेव्हा आरोपी शेख साबीर शेख सादीक याने सईदच्या आईला शिवी देउन अंगावर धावून आला, तेवढयात सईद त्यास बोलण्यास गेला असता साबीरने त्याचे घरामधील लोखंडी सुरी सारखे अवजार सईदच्या नाकावर मारून जखमी केले. त्यानंतर सईदचा भाउ शेख फईम शेख रहिम कुरेशी भांडण सोडविण्यासाठी आला असता शेख फहिमला शेख मुजाहिद याने लाकडी राफ्टरने डोक्यात मारहाण केली. त्यामुळे त्याला दवाखान्यात भरती करावे लागले. त्याची तब्येत जास्त बिघडल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबादला भरती केले होते.

उपचारादरम्यान  03. नोव्हेंबर रोजी शेख फहिम शेख रहिम याचा मृत्यू झाला होता. सदरचे रिपोर्टवरून आरोपी शेख साबीर शेख सादीक, शेख मुजाहिद शेख सादीक व रूकैयाबी शेख सादीक (सर्व रा. इकबाल नगर,बुलडाणा) यांच्याविरूध्द कलम विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपास अधिकारी बुलडाणा यांनी वि.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बुलडाणा यांच्या न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षाने सात साक्षीदाराची साक्ष नोंदविली. आरोपी शेख साबीर, शेख मुजाहिद आणि रूखैयाबी यांना कलम 302,34 नुसार जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी 5,000 दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरी अशी शिक्षा सुनावली. तसेच शेख साबीर याने फिर्यादी शेख सईद यांस सुरा मारल्यामुळे शेख साबीर यांस पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व 5.000 दंड व दंड न भरल्यास 6 महिने सक्त मजुरीची सजा सुनावली. तसेच सदरच्या प्रकरणातील तिन्ही आरोपी यांना रू. 10,000 रुपये नुकसान भरपाई मृतक शेख फहिम शेख रहिम याचे कुटुंबियास दयावी असा आदेश दिले आहे.

सदरचे प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अॅड. एस. पी. हिवाळे सहायक सरकारी वकील तथा अति. सरकारी अभियोक्ता बुलडाणा यांनी काम पाहले व त्यांचा युक्तीवाद ग्राहय धरून वि न्यायालयाने तिनही आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली याबरोबरच कोर्ट पैरवी अधिकारी पो. हे. कॉ. किशोर कांबळे यांचे सहकार्य लाभले व त्यांनी वेळोवेळी साक्षीदारांना हजर करण्यासाठी मदत केली.