सामायिक विहिरीचा वाद जीवावर बेतला! पुतण्याने चुलत्याचा खून केला; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

 
bibi
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सामायिक विहिरीच्या वादातून चुलत पुतन्याने चुलत्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चुलत्याचा उपचारादरम्यान संभाजीनगर येथे मृत्यू झाला. सिंदखेडराजा तालुक्यातील देऊळगाव कोळ येथे ही घटना घडली असून या प्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात संतोष गायकवाड ( रा.देऊळगाव कोळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण दगडु गायकवाड(७५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नारायण गायकवाड आणि आरोपी संतोष गायकवाड हे दोघे नात्याने चुलत चुलते आणि पुतणे आहेत. त्यांच्यात गेल्या काही वर्षांपासून शेतातील सामायिक विहिरीवरून वाद होते. दिनांक २ ऑक्टोबरच्या दुपारी संतोष गायकवाड ने चुलता नारायण गायकवाड यांच्या डोक्यात बांबूच्या काडीने जोरदार प्रहार केले. यामध्ये नारायण गायकवाड हे गंभीर जखमी झाले.

  त्यांना तातडीने उपचारासाठी आधी मेहकर व प्रकृती गंभीर झाल्याने संभाजीनगर येथे हलविण्यात आले. दरम्यान उपचारादरम्यान ४ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.दरम्यान पोलिसांनी उपचार सुरू असताना नारायण गायकवाड यांचा जबाब घेतला होता, त्या जबाबाच्या आधारे आरोपी संतोष गायकवाड विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कलिम देशमुख, अरुण सानप, यशवंत जैवाळ व अंभोरे हे करीत आहेत.