स्वतःसोबत इतरांची पण "सोय" लावत होता लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी! २५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडला; जळगाव जामोद येथील कारवाई

 
karyalay
जळगाव जामोद ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जळगाव जामोद येथील लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे स्वतःसाठी ७ हजार, इतर साथीदारांसाठी १२ हजार अन् दंडाची रक्कम म्हणून ६ हजार असे २५ हजार रुपये त्याने लाकडाची वाहतूक करणाऱ्या टाटा ७०९ च्या मालकाला मागितले होते. मात्र तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली आणि  एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रचलेल्या सापळ्यात लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी अलगद अडकला. आज ,१३ मे रोजी जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. भगतराम द्वारकादास कटारिया (४७, रा. गजानन नगर, अकोट, जि. अकोला) असे या लाचखोराचे नाव आहे.

जळगाव जामोद ला लागून असलेल्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या पंचगव्हान येथील ३२ वर्षीय टाटा ७०९ या मालवाहू वाहनाच्या मालकाने याबाबत तक्रार दिली होती. तक्रारदाराचे टाटा ७०९ हे वाहन लाकूड वाहतूक करतांना मिळून आल्याने ते जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात लावण्यात आले होते.

हे वाहन सोडण्यासाठी लाचखोर वनपरिक्षेत्र अधिकारी भगतराम याने स्वतःसाठी ७ हजार, इतरांसाठी १२ हजार व दंडाची रक्कम ६ हजार अशी एकूण २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर आज  तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचून लाचखोर भगतरामला २५ हजार रुपये घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले.

त्याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणाचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, पोहेकॉ विलास साखरे, पोना मोहम्मद रिजवान, रवींद्र दळवी, प्रविण बैरागी,  अझरुद्दीन काझी, अर्शद शेख यांनी केली. कुणीही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा  त्यांच्यावतीने एखादा शासकीय व्यक्ती शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
 संपर्क - ०७२६२-२४२५४८