बिबट्या नव्हे अस्वलाच्या हल्ल्यात झाला मुरादपुरच्या कासाबाईच्या मृत्यू! वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले अस्वलाचे ठसे; अस्वलाला जेरबंद करण्याची परिसरातील शेतकऱ्यांची मागणी;
उद्या आमचाही नंबर लागेल...

कासाबाई श्यामराव गाडेकर (रा. मुरादपूर, ता.चिखली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. काल, त्या शेतात गेल्या होत्या. मात्र संध्याकाळ पर्यंत त्या न परतल्याने कुटुंबीयांनी पाहणी केली असता शेतातील तुरीच्या पाट्यात रक्तबंबाळ अवस्थेत कासाबाईंचा मृतदेह आढळला होता. दरम्यान काल, हा हल्ला बिबट्याने केला की अस्वल किंवा लांडग्याने याबाबत संभ्रम होता. रात्रीची वेळ असल्याने प्राण्याचे ठसे उमटलेले दिसत नव्हते. दरम्यान आज, वनविभागाने महिलेच्या मृतदेहाची व घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा मुरादपूर परिसरात अस्वलाचा वावर असल्याची चिन्हे दिसून आली. त्यामुळे सदर महिला अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे शिक्कामोर्तब झाले.
शेतकरी म्हणतात..
दरम्यान सध्या रब्बीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावे लागते. अस्वलाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याचे समोर आल्यानंतर परिसरातील शेतकरी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. काल, रात्री जंगली जनावरांच्या भीतीने मुरादपुरचे अनेक शेतकरी पिकांना पाणी द्यायला शेतात गेले नाहीत.आधी त्या अस्वलाला जेरबंद करा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. उद्या अशाच घेटनेत आमचा नंबर लागला तर काय असा सवालही शेतकरी उपस्थित करीत आहेत.