भीषण अपघात! ओव्हरटेकच्या नादात ट्रक एसटी बसची धडक; १९ प्रवाशी जखमी! मेहकर - डोणगाव रोडवरील हॉटेल मयुर व्हेज जवळील घटना..!

 
wrsef
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव ट्रक आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण दुर्घटनेत एसटी बसमधील १९ प्रवाशी गंभीर जखमी झाले. मेहकर डोणगाव रोडवरील हॉटेल मयुर व्हेज जवळ आज, १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

 प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद  वरून नागपूरकडे  जाणारी एसटी बस ( एमएच २०, बी एल ३३१४) व मेहकर वरून डोणगाव कडे जाणारा ट्रक( एम एच २१, बी एच ९७९७) यांची हॉटेल मयुर व्हेज समोर धडक झाली. या अपघातात एसटी बसमधील चालक ,वाहक यांसह १९ प्रवाशी गंभीर जखमी झाले. औरंगाबाद आगाराची ही बस चालक प्रताप पंढरी इंगळे व वाहक संतोष विश्वनाथ आठवले नागपूरला घेऊन जात होते.

अपघात एवढा भीषण होता की बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी गाठून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघात एसटी बसचे ८० हजार रुपयांचे  तर ट्रकचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.