भीषण अपघात! एसटी बसच्या बाहेर आलेल्या पत्र्याने दोघांचे हात तुटून पडले! मलकापूर बसस्थानकात तोडफोड

 
knkj
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एसटी बसच्या धारधार पत्र्याने रस्त्याने जाणाऱ्या दोघांचे हात तुटून शरीरावेगळे पडले. या प्रकारामुळे संतप्त गावकऱ्यांनी मलकापूर बसस्थानकात तोडफोड केली. आज, १६ सप्टेंबर रोजी सकाळी मलकापूर ते पिंपळगाव देवी दरम्यान आव्हा गावाजवळ ही घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार अपघातास कारणीभूत ठरलेली बस मलकापूर आगाराची आहे. सकाळी सहाच्या सुमारास आव्हा येथील शेतकरी परमेश्वर सुरडकर(५५) हे  पायी शेतात जात असताना बसच्या पत्र्यामुळे त्यांचा हात कटला. रस्त्यावर पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या दोन तरुणांना देखील या पत्र्याने जखमी केले. त्यातील विकास गजानन पांडे (२२) या तरुणाचा हात कटून शरीरावेगळा झाला.

शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव खान्देश येथे हलविण्यात आले असून विकास व त्याच्या जखमी मित्रावर मलकापूरतील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणानंतर आव्हा ग्रामस्थांनी मलकापूर आगारात तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अपघाताचे घटनास्थळ धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याचे बसचालकाविरुद्ध धामणगाव बढे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.