भीषण! उभ्या ट्रकवर मोटारसायकल मागून धडकली; मोटारसायकलस्वार जागीच ठार!चिखली तालुक्यातील मलगी फाट्याजवळील घटना

 
kjhj
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रस्त्यात बंद पडलेल्या उभ्या ट्रकवर भरधाव दुचाकी धडकल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. काल, २८ ऑक्टोबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास चिखली देऊळगावराजा रोडवरील मलगी फाटा ते मुरादपूर दरम्यान ही घटना घडली. प्रकाश बिदेसिंग गाडेकर(४०, रा. मुरादपूर, ता.चिखली) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार प्रकाश गाडेकर हे चिखली येथे एका इलेक्ट्रॉनिक दुकानावर कामाला होते. काम ओटोपून घराकडे परत जात असतांना मलगी फाट्यापासून काही अंतरावर एका बंद पडलेल्या उभ्या ट्रकवर त्यांची दुचाकी धडकली.

या अपघातात त्यांच्या मेंदूला मोठा मार लागला. स्थानिकांनी त्यांना तातडीने चिखली येथील एका खाजगी दवाखान्यात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनास्थळ अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.