विद्यार्थ्यांनो, रॅगिंगने करिअर होऊ शकते उध्वस्त! कैलास गायकवाडच्या मृत्यूला कारणीभूत ३ विद्यार्थ्यांसह ५ जणांवर रॅगिंगचे गुन्हे!

 
Gggu
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  रॅगिंग हा असा गुन्हा आहे की, जिथे एकीकडे पीडित विद्यार्थ्यांनी अनेकवेळा जीवघेणे पाऊल उचलले आहे, तर दुसरीकडे आरोपी आणि दोषी विद्यार्थ्यांचे करियर डळमळीत होते.नियम आणि कायदे केल्या नंतरही काही शैक्षणिक संस्थांमध्ये अशा तक्रारी पुढे येतात. लोणार येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रॅगिंग प्रकरण समोर आले असून ५ जणांविरुद्ध रॅगिंगचे गुन्हे दाखल करण्यात आले. यात ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना २३ जानेवारीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

लोणार येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी कैलास गायकवाड याने १९ जानेवारीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी मृतक कैलास चे मामा योगेश कोल्हे यांनी पोलिसांना तक्रार दिली होती. वस्तीगृहाचे गृहपाल डीडी मुरमुरे यांनी कैलासवर रॅगिंग होत असताना दुर्लक्ष केले व शिक्षक अनिल काळे यांनी विद्यार्थ्यांसमोर कैलासला शिवीगाळ करून त्याचा मानसिक छळ केला. याशिवाय कैलासला विद्यार्थ्यांनी नग्न केल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप कोल्हे यांनी तक्रारी केला होता.

दरम्यान पोलिसांनी शिक्षक अनिल काळे व गृहपाल मुरमुरे आणि ३ विद्यार्थ्यांवर रॅगिंगचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान कोणत्याही शिक्षण संस्थेत शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलांच्या पालकांनीही मुलांकडे लक्ष देण्याची गरज असून,असे कृत्य करू नये,याबाबत समजावून सांगणे अत्यावश्यक ठरत आहे. अन्यथा अशा घटनांनी त्यांचे करिअर धोक्यात येऊ शकते.