"कुछ तो गडबड है..! आधी सोयाबीन सुडी पेटली नंतर शेतकऱ्याचा मृत्यू; लोकांमध्ये चर्चा घातपाताची,कारण बातमी वाचून कळेल..! रायपुरची धक्कादायक घटना

 
raypur
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. ३० ऑक्टोबरच्या रात्री शेतकऱ्याचा मृत्यू झाला, त्याच रात्री त्यांची शेतातील ५ एकर सोयाबीन सुडी पेटली. दरम्यान गावातील लोकांमध्ये या प्रकाराबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पोलिसांना सुद्धा हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने  रायपूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी बऱ्याच बाबी स्पष्ट होतील असे ठाणेदार राजरत्न आठवले "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना सांगितले.

एकनाथ फौलाने (५०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घरच्यांनी दारू प्यायला पैसे दिले नाही  म्हणून  दारूच्या नशेत स्वतःच्या शेतातील ५ एकरातील सोयाबीन सुडी एकनाथ फौलाने यांनी पेटवून दिली. त्यांनी स्वतःच  कुटुंबीयांना तशी माहिती दिल्याची चर्चा आहे. त्यानंतर त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृत्यू कशाने झाला, हा घातपात आहे का याबाबत तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खरे समोर येण्याची शक्यता आहे.