धक्कादायक! वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी गच्चीवर गेलेल्या महिलेचा लोंबकळत्या तारांना स्पर्श! शॉक लागून जागीच मृत्यू; खामगाव तालुक्यातील घटना

 
jyfy
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  गच्चीवर वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा घरावरून जाणाऱ्या मेन लाईनच्या लोंबकळत्या तारांना स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा  शॉक लागून महिलेचा जागीच मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथे काल, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेंभुर्णा येथील गोकुळाबाई भानुदास निलजे (६०) ह्या घरावरील गच्चीवर वाळत टाकलेले कपडे आणण्यासाठी गेल्या. त्यावेळी ११ केव्हीच्या मेनलाइनच्या लोंबकळत असलेल्या तारांना त्यांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून महावितरणच्या हलगर्जी पणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.