इंस्टाग्रामवरून तिच्या नांदी लागला अन् आयुष्याचा खेळखंडोबा करून बसला! तीच्यापाई नोकरी गेली आता कुणी पोरगी देईना.., आता म्हणतो ,पोरांनो मी चुकलो,तुम्ही चुकू नका! चिखलीच्या तरुणाची सॅड लव्ह स्टोरी...!

 
jyh
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रेम म्हणजे प्रेम असतं अन् तुमचं आमचं सेम असत..ही कविता असली तरी सगळ्यांचं काही सेम नसत हेही तेवढंच खरं हाय..एकदा माणूस प्रेमात पडला की तो कधी अन् कसा बाहेर निघेल हे सांगता येत नाही..काही जणांचे प्रेम सक्सेस होतेही मात्र प्रेमात अपयश येणाऱ्यांची संख्याच जास्त असते. प्रियकर आणि प्रेयसी वेगळ्या जातीचे असले की सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो..आई ,वडील कुटुंब की प्रियकर किंवा प्रेयसी यापैकी एकाची निवड करण्याची दुर्दैवी वेळ अनेकांवर येते, आणि तिथूनच सारा घोळ होतो.. चिखली तालुक्यातील एका गावातील तरुणाने त्याची दुःखद लव्ह स्टोरी  लाइव्ह  ग्रुपला  पाठवली..त्याचा हा सारांश..!

वैभव (नाव बदलेले आहे) हा एका चांगल्या कंपनीत नोकरीला. महिन्याला ३० हजार रुपये मिळायचे. कमी वयात नोकरीला लागल्याने त्याच्या कुटुंबीयांना आनंद झाला होता. वर्क फ्रॉम होम असल्याने वैभव घरूनच काम करायचा. कामाचा व्याप जास्त नसल्याने अधूनमधून तो इंस्टाग्राम वर सक्रिय असायचा. नवनवीन रील बनवणे, फोटो अपलोड करने, रील पाहणे असा उद्योग त्याचा सुरू होता.  वैभव दिसायला चांगला असल्याने त्याच्या मित्रयादीत मुलींची संख्याही वाढू लागली होती. मुली स्वतःहून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात म्हणून आता वैभवलाही जरा भारी वाटत होते. अश्यातच त्याची दिव्याशी ( नाव बदलले आहे) इंस्टाग्राम वरून ओळख झाली. दोघेही एकमेकांशी चॅटिंग करीत होते. त्याचे स्टेटस अपलोड होताच पहिले लाईक दिव्याचेच असायचे. दिसण्यावरून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. अर्थात वैभव हा दिव्याच्या आयुष्यातला आतापर्यंतचा तिसरा होता,मात्र वैभवला याची कल्पना नव्हती. डोळे बंद करून तो तिच्यावर विश्वास ठेवू लागला. आपल्या दोघांची जात वेगळी असल्याची कल्पना वैभवला होती,मात्र वेळ आली तर कुटुंबियांची समजूत काढू असा विश्वास वैभवला होता. आता वैभवला स्वतःच्या मित्रांपेक्षा, कुटुंबापेक्षा दिव्या जास्त महत्वाची वाटू लागली होती..तो बराच वेळ मोबाईल मध्ये व्यस्त असल्याने आईने विचारणा केल्यास तो आईवरही चीडचीड करू लागला होता..कारण दिव्या हेच आपले सर्वस्व असे त्याला वाटू लागले होते.
   
नोकरी गमावली..!

  दरम्यान नंतरच्या काळात तिच्या भेटीसाठी वैभव जीवाचे रान करू लागला. त्यामुळे कंपनीच्या कामाकडे त्याचे दुर्लक्ष झाले. तिच्या मॅसेज ला रिप्लाय दिला नाही तर ती रागावेल म्हणून काम सोडून तो तिच्याशी चॅटिंग करण्यात व्यस्त राहत होता. मात्र या सगळ्या काळात वैभव चिडचिडा झाला होता. घरातील लोकांशी, कंपनीच्या बॉस शी सुद्धा चीड चीड पणे वागू लागला. मात्र दिव्याशी बोलतांना त्याचा सगळा चीडचीड पणा बंद होई.या सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम झाला, आणि कंपनीने नोकरीवरून काढून टाकल्याने वैभव बेरोजगार झाला.
    
पैसा संपल्याने आता दिव्याही दूर झाली...!

    मुळात वैभवच्या घरची परिस्थिती आधीच बेताची होती. मात्र त्याला नोकरी लागल्याने सगळ काही ठीक सुरू होत. मात्र दिव्याचा नांद लागल्यानंतर वैभवला पगारही पुरत नव्हता. तिच्यासाठी तो वाटेल तो करायचा, तिच्या मोबाईल चे रिचार्ज, कपड्यांचा खर्च, महागडे गिफ्टस यामुळे घरात कमी अन् दारात जास्त खर्च अशी वैभवची अवस्था झाली होती. मात्र त्याच वेळा वैभवसारखे दिव्याचे तीन मित्र(?) होते ,मात्र दिव्या फक्त आपलीच ही भोळी भाबडी आशा वैभवला होती. मात्र नोकरी गमावल्याने आता वैभव प्रचंड आर्थिक अडचणीत होता. आतापर्यंत त्याच्या या अफेअरची, नातेवाईकांत अन गावात बक्कळ चर्चा झाली होती. वैभवकडील पैसा संपताच दिव्याच्या वागण्यात मोठा बदल होत असल्याचे त्याला जाणवू लागले. ती त्याचा फोन घेणे टाळू लागली, उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. एक दिवस तर चक्क तिच्या एका बॉयफ्रेंड सोबत गळ्यात गळे घालून फिरताना त्याला ती दिसली अन् वैभव अक्षरशः रडू लागला. तिच्यासोबतचे जुने फोटो अन् व्हिडिओ पाहून आता त्याला स्वतःचाच राग येऊ लागला.
   
सगळ संपल...!

 दरम्यान नोकरी गेली, दिव्या गेली... चीड चीड करणाऱ्या स्वभावामुळे जवळचे लोक दूर गेले.. अफेअरची आधीच सगळीकडे चर्चा झालेली..त्यामुळे वैभव आता एकटा पडला..२२ वर्षांचा असताना त्याला चांगली स्थळे येत होती,मात्र दिव्याचा नांद लागल्याने त्याने लग्न लांबवले..आता तो २६ वर्षांचा होऊन गेला, दिव्याही गेली...आता एकटेपणा घालवण्यासाठी लग्न करण्याचा विचार तो करू लागला मात्र त्याच्याबद्दल आधीच सगळ माहीत असल्याने त्याला स्थळेच येत नाही..आधी जर डोळे उघडे ठेवून प्रेम केले असते, घरच्यांचे एकले असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती असे वैभव म्हणतो. सोशल मीडियावरून कुणाच्या प्रेमात पडतांना दहा वेळा विचार करा..तुमच्यावर कुटुंबीयांपेक्षा कुणीही जास्त प्रेम करीत नाही त्यामुळे घरच्यांचे ऐका , मी चुकलो पण तुम्ही चुकू नका असे वैभव आता त्याच्या मित्रांना सांगतोय.