भारताची सीमा पार करण्याआधीच २गुन्हेगारांना बेड्या! बांगलादेशात जात होते पळून..!! देऊळगावमहीत फोडली होती मोबाईल शॉपी; 5 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! LCB ची मोठी कारवाई

 
iugy
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथून मोबाईल शॉपी फोडून फरार झालेल्या 2 गुन्हेगारांना भारताची सीमा पार करण्याआधीच पश्चिम बंगालमधील हुबळी येथून स्थानिक गुन्हे शाखेने 20 डिसेंबर रोजी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तीची धडाकेबाज कारवाई करण्यात आली. लूकमान खान मोहम्मद (26), मोमीन खान होशियार खान(27) रा. जनमत तालुका पून्हणा, हरियाणा अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहे.

 देऊळगाव मही येथील बस स्थानक चौकातील कमलेश कोठारी यांची मोबाईल शॉपी 14 डिसेंबरच्या मध्यरात्री सदर आरोपींनी फोडून 358000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. देऊळगाव मही पोलीस ठाण्यात याप्रकरणी 15 डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बळीराम गीते व त्यांच्या पथकांनी तंत्र विश्लेषनावरून आरोपींचा माग काढला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी बांगलादेशात जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना जेरबंद केले. सराईत गुन्हेगार लूकमान खान मोहम्मद हा जेसीबी मशीनवर देऊळगाव मही येथे मजूर म्हणून काम करत होता. त्याने गाव सोडून जाण्यापूर्वी कमलेश कोठारी यांच्या मोबाईल शॉपी वर पाळत ठेवली होती. दरम्यान संधी साधून साथीदार मोमीन खान होशियार खानसह मोबाईल शॉपी फोडून दोघेही फरार झाले होते. परंतु या दोन्ही आरोपींना  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विविध कंपनीचे 110 मोबाईल, पेन ड्राईव्ह, बॅटरी, चार्जर असे एकूण 501000 रुपयांचा मुद्देमाल  हस्तगत केला आहे.

यांनी केली कामगिरी

जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, अशोक थोरात, स्थागूशा प्रमुख बळीराम गीते, सायबरचे पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित वानखडे, विलास कुमार सानप, मनीष गावंडे, श्रीकांत जिंदमवार, सुधाकर काळे, सुनील खरात, गजानन गोरले, गणेश पाटील, पुरुषोत्तम आघाव, अनंता फरदळे,केदार फाळके, वैभव मगर, दुर्गेश राजपूत, राजू आढवे,कैलास ठोंबरे यांनी ही कामगिरी केली.