कृषी केंद्र फोडून ५ लाख रुपयांचे बियाणे चोरले! कोणत्या शेतात पेरले पोलीस शोधून शोधून थकले..! मोताळा शहरातील घटना

 
gfhgg
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कृषी केंद्र फोडून चोरट्यांनी ५ लाख रुपयांचे बियाणे चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे परिसरात संशयास्पद हालचाल दिसत असल्याने एका नगरसेवकाने पोलिसांना माहिती दिली मात्र पोलीस वेळेवर पोहचू न शकल्याने चोरटे पसार झाले. या प्रकारामुळे मोताळा शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मोताळा शहरातील आठवडी बाजारातील नांदुरा रोडवर सुरेश सदानी यांचे कृषी केंद्र आहे. ६ जूनच्या पहाटे सव्वा २ ते ३  वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील ३० किलो वजनाच्या सोयाबीनच्या ६० बॅग, कपाशी बियाण्याच्या वेगवेगळ्या कंपनीच्या ६० बॅग, सिजेंटा कंपनीच्या ५० बॅग, तुरीच्या बियाण्यांच्या १० बॅग व रोख १० हजार रुपये  असा एकूण ५ ते साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी टाटा मॅक्सीमो गाडीत टाकून चोरून नेल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

दरम्यान कृषी केंद्र परिसरात घर असलेल्या एका नगरसेवकाने २ वाजून ५६ मिनिटांनी पोलिसांना फोन करून परिसरात संशयास्पद लोक फिरत असल्याची माहिती दिली होती. मात्र बोराखेडी पोलिसांना घटनास्थळी पोहचायला उशीर झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. कृषी केंद्र चालक सदानी यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला  असून या खळबळजनक प्रकारानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासासाठी पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.