घराकडे का पाहतो असे म्हणत बापलेकांनी केला तरुणाचा खून!; कुऱ्हाडीने केले सपासप वार; जळगाव जामोद तालुक्यातील खळबळजनक घटना

 
7yuo
जळगाव जामोद ( बुलडाणा लाइव्ह वृत्तेसेवा)- शेतात जातांना येतांना आमच्या घराकडे का पाहतो असे म्हणत एकाच कुटुंबातील चौघांनी २५ वर्षीय तरुणाच्या अंगावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याचा निर्घृण  खून केला. ही खळबळजनक घटना ३ मे च्या रात्री जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे घडली. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात  चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपेश किसन राऊत (२६, रा.पिंपळगाव काळे, ता.जळगाव जामोद) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मृतक सुपेशच्या भावाने याप्रकरणाची तक्रार दिली आहे. ३ मे च्या रात्री  साडेआठच्या सुमारास मृतक सुपेश आणि त्याचा लहाना भाऊ अजय त्यांच्या घराजवळील चौफुलीजवळ बसलेले होते. थोड्या वेळाने अजय घराकडे जेवायला येत असताना मोठा भाऊ सुपेश हा दुकानात विमलची पुडी आणण्यासाठी जात होता. त्यावेळी अचानक मागच्या गल्लीतून   किसना रमेश वरनकार हा हातात कुऱ्हाड घेऊन धावत सुपेशच्या अंगावर धावत आला. किसना वरनकार ने सुपेशच्या अंगावर कुऱ्हाडने सपासप वार केले. तेवढ्यात किसना चे दोन्ही मुले गणेश वरनकार आणि अजय वरनकार व किसनाचा मोठा भाऊ हरिदास वरनकार हे सुद्धा तिथे आले. तू जातांना येतांना आमच्या घराकडे का पाहतो असे म्हणत त्याला चौघांनी बेदम मारहाण केली. सुपेशची आई आणि भाऊ  अजय राऊत सुपेशला सोडवायला गेले असता त्यांनी त्यांनाही लोटपोट करून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत सुपेशला  जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र  त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून किसना रमेश वरनकार, गणेश किसना वरनकार, अजय किसना वरनकार व हरिदास वरनकार ( सर्व . रा.पिंपळगाव काळे,ता. जळगाव जामोद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत.