हैवानियत..! बाप निघाला सैतान; १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून केला,मृतदेह शेततळ्यात फेकला! मेहकर तालुक्यातील मोळी येथील धक्कादायक घटना

 
dongao
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोळी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत शेततळ्यात सापडल्याची घटना ११ नोव्हेंबरला उघडकीस आली होती. दरम्यान आता या प्रकरणात महत्वाचा सुगावा पोलिसांच्या हाती लागला असून मुलीच्या जन्मदात्या बापानेच तिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी डोणगाव पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली.

कु मयुरी मनोज वानखेडे (१७, रा. मोळी) या मुलीचा मृतदेह लोणी गवळी शिवारातील शेततळ्यात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. डोणगाव पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान शवविच्छेदन केल्यानंतर मयुरीचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते. मात्र खुनी नेमका कोण हे समोर न आल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    
सगळं काही संशयास्पद..!

  दरम्यान खून्याचा शोध लावण्यासाठी स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी डोणगाव मध्ये तळ ठोकून होते.  मयुरी ८ नोव्हेंबरच्या दुपारपासून घरी नव्हती, मात्र याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांकडून  याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती. त्यामुळे संशयाची सुई मयुरीच्या कुटुंबीयांकडे होती. पोलीसांना तपासादरम्यान कुटुंबियांकडून भिन्न भिन्न स्वरूपाची उत्तरे मिळत होती. त्यामुळे मुलीच्या वडिलांनीच तिचा खून केल्याच्या निष्कर्षापर्यंतपोलीस पोहोचले आहेत. त्यामुळे पोलिसांनी मयुरीच्या वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असून यात आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासाच्या कारणास्तव खुनाचे नेमके कारण काय याबाबतची नेमकी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.