जुगाऱ्यांवर ओढवली संक्रांत! शेतात रंगला होता पत्त्यांचा डाव! मोताळा तालुक्यातील कोथळीत ७ जुगाऱ्यांना पकडले, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 
tiyyu
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  एक्का- बादशाहचा जुगार ग्राम कोथळी येथील शेतात रंगला असताना, बोराखेडी पोलिसांनी धाड टाकल्याने ७ जुगाऱ्यांवर मकरसंक्रांतीपूर्वीच नामुष्कीची व आर्थिक संक्रांत ओढावली.जुगाऱ्यांकडून २ लाख ९६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जुगारी एक्का- बादशाहच्या खेळांमुळे कर्जबाजारी होतात.त्यांच्यावर घरदार विकण्याची वेळ येते.अनेक जुगारी खासगी सावकारांकडून उधार पैसे घेऊन हरतात.पैसे हरलेले टोकाची पावले उचलतात, असे प्रकार समोर आले असले तरी, जुगारी जुगार खेळणे काही सोडत नाहीत. काही जुगार भरवून नाल अर्थात पैसे प्राप्त करतात.

बोराखेडी पोलिसांनी काल, १४ जानेवारीला ग्राम कोथळी येथील शेतात रंगलेल्या जुगार अड्ड्यावर नियोजनबद्ध धाड टाकली. यामध्ये शकील शहा अकबर शहा रा. मोताळा, सय्यद अख्तर सय्यद सत्तार रा. कोथळी, शहाजी बाबुराव जोहरी रा. कोथळी, विनोद गोविंदा वावगे रा. कोथळी, मुरलीधर पंढरी चोपडे रा. मोताळा, युनूस खान अफसर खान रा. मोताळा, कैलास दयाराम सरोदे रा.बोराखेडी या 
जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोबाईल, वाहने, खेळातील नगदी रुपये असा एकूण २ लाख ९६ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जुगाऱ्यांवर महाराष्ट्र जुगार कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बोराखेडीचे  ठाणेदार बळीराम गीते यांच्या नेतृत्वात एका पोलीस पथकाने केली.