जिल्ह्यात पावसाचा हाहाकार..! साठेगावात शेतात काम करणाऱ्या पती - पत्नीवर पडली वीज, पत्नी ठार पती गंभीर! धामणगाव बढेत वीज पडल्याने तीन जनावरे दगावली

 
tfy
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आठवडाभरापासून गायब असलेल्या पावसाने काल, ४ जूनपासून जिल्ह्यात विविध भागात दमदार हजेरी लावली. चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मोताळा तालुक्यात मुसळधार पाऊस  बरसला. दरम्यान पावसाच्या या रौद्ररुपात विजेचे तांडव सुद्धा पहायला मिळाले. सिंदखेडराजा तालुक्यातील साठेगाव शेतात काम करीत असताना पती पत्नीवर वीज कोसळली त्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाले आहेत. दुसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे वीज कोसळून दोन बैल आणि एका गायीचा मृत्यू झाला.

बुलडाणा लाइव्ह चे बिबी येथील प्रतिनिधी निलेश डिघोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल, दुपारी किनगाव राजा परिसरात मुसळधार पाऊस बरसला. साठेगाव येथील  गजानन नागरे व त्यांची पत्नी रुक्मिणी नागरे हे त्यांच्या शेतात काम करीत होते. मुसळधार पावसामुळे त्यांनी झाडाखाली आश्रय घेतला. त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने रुक्मिणी नागरे यांचा जागीच मृत्यू झाला तर गजानन  नागरे हे गंभीर असून त्यांना तातडीने उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.

दुसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे शिवारात दोन वेगवेगळ्या घटनेत वीज कोसळल्याने दोन बैल आणि एका गायीचा मृत्यू झाला. रिधोरा येथील राजेंद्र कानडजे यांच्या धामणगाव बढे शिवारातील शेतात वीज कोसळल्याने दोन बैल ठार झाले. दुसऱ्या घटनेत वीज कोसळल्याने धामणगाव बढे येथील  कैलास त्रिंबक शहाणे यांची गाय मृत्युमुखी पडली.