आक्षेपार्ह पोस्ट टाकली; लिपिकाला अटक; धाडमध्ये तणाव

 
धाड पोलीस ठाणे
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध धाड पोलीस ठाण्यात आज, ५ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोस्ट  टाकणाऱ्याला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी धाड पोलीस ठाण्यात नागरिकांनी गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. संशयित हा  जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे.

धाड येथील ३२ वर्षीय युवकाने या प्रकरणात तक्रार दिली. त्याच्या मित्रयादीतील लिपिकाला ३ मे रोजी व्हॉटस् ॲपवरून शुभेच्छा संदेश पाठवला होता. या संदेशाला रिप्लाय करताना लिपिकाने आक्षेपार्ह व प्रक्षोभक संदेश पाठविल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारीवरून पोलिसांनी लिपिकाला गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याआधी भावना दुखावल्या म्हणून आरोपीला तात्काळ अटक करा, अशी मागणी करत मोठा जमाव धाड पोलीस स्टेशनच्या आवारात जमा झाला होता. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.