चिखलीचे पुजा गायकवाड आत्महत्या प्रकरण! नवरा अक्षयचे दुसरीकडे होते लफडे! माहेरच्यांना घातपाताचा संशय! छळकहाणी वाचून अंगावर काटा येईल

 
pppp
चिखली ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या संभाजीनगरात पुजा अक्षय गायकवाड  या १९ वर्षीय विवाहितेने काल, आत्महत्या केली होती. पुजाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार ५ तोळे सोन्याचा तगादा लावल्याने सासरच्या लोकांनीच तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. यावरून तिच्या नवऱ्यासह सासू ,सासरे व दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान अक्षयचे बाहेरच एका ठिकाणी अनैतिक संबंध होते त्यामुळेच तो पत्नीला त्रास देत होता असेही समोर येत आहे.

विशेष म्हणजे लग्नानंतर अवघ्या तीनच महिन्यात पुजाने जगाचा निरोप घेतला. पुजाचा नवरा अक्षय सिव्हील इंजिनिअर आहे. पुजाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नाआधीच त्यांनी १० तोळे सोन्याची मागणी केली होती. मात्र मध्यस्थी लोकांनी ५ तोळे सोने व लग्न धूमधडाक्यात करायचे सांगितले .जाफ्राबादच्या गुरुकृपा लॉन मध्ये १८ जून २०२२ ला धूमधडाक्यात लग्न लागले. मात्र लग्नानंतर नवरा , सासू,सासरे, दिर हे तिला आणखी ५ तोळे सोने पाहिजे म्हणून त्रास देऊ लागले.

 दरम्यान तिने होणाऱ्या त्रासाची कल्पना वडिलांनी दिली, मात्र परिस्थिती गरिबीची असल्याने ते ५ तोळे सोन्याची मागणी पूर्ण करू शकले नाही.  सुरुवातीला काही दिवस त्रास देतील,नंतर परिस्थिती बदलेल अशी समजूत पुजाच्या आईवडिलांनी घातली होती..

अक्षयचे अनैतिक संबंध..

 दरम्यान पुजा रक्षाबंधनाला माहेरी गेली होती. त्यावेळी  नवरा अक्षय चे कुठेतरी अनैतिक संबंध असल्याने तो मला वारंवार मारहाण करतो व भांडतो असे तिने आई वडिलांना सांगितले होते. महालक्ष्मी बसविण्याकरीता सुद्धा माहेरवरून ३५ हजार आणायला सांगितले होते, त्यावेळी पुजाच्या वडिलांनी स्वतः १० हजार रुपये आणून दिल्याचे देखील तक्रारीत नमूद आहे.

त्या दिवशी असं काय झालं...

 दरम्यान पुजाने आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी दुपारी भावाला फोन केला. नवरा, सासू,सासरा ,दिर आज सकाळपासून प्रचंड त्रास देत आहेत, तू घर सोडून निघून जा,तुला मी कायमची संपवेन अशी धमकी पुजाची सासू देत असल्याचे तिने सांगितले. आम्हाला तुला नांदवायचे नाही असेही तिची सासू तिला म्हणत होती, मला इथे त्रास असह्य होतेय असेही पुजाने भावाला सांगितले. त्यामुळे त्या दिवशी पुजा ला संपविण्याची भाषा करेपर्यंत मजल का गेली? त्यादिवशी असं काय झालं याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी २० तारखेला सकाळी पुजाने आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून पुजाच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.