अरेच्चा..! त्यांची हिम्मत तर लईच वाढली; दारूबंदी करायला गेलेल्या पोलिसांसोबत धक्काबुक्की; १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 
khamgav
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे दारूबंदी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत जमावाने धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली असून हिवरखेड पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाखनवाडा येथे अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे ठाणेदारांच्या आदेशाने पोलीस नायक सुरेश बाबू हे सहकाऱ्यासोबत कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी गावातील काहींनी कारवाईला विरोध केला. गैरकायद्याची मंडळी जमवून सुरेश बाबू राठोड  व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली. दरम्यान राठोड यांनी काल, सायंकाळी तशी तक्रार हिवरखेड पोलीस ठाण्यात दिली असून तक्रारीवरून नवनीत सोनाळकर, साधू मार्कड, ज्ञानेश्वर सोनाळकर , आकाश वानखेडे, एकनाथ पांढरे यांच्यासह १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.