भूमि अभिलेख कार्यालयाची तोडफोड प्रकरणी एकाला सहा महिन्यांची शिक्षा! चौघे निर्दोष;"मनसे"पदाधिकाऱ्याचा समावेश!; मलकापुरातील घटना

 
kort
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  मलकापूर येथील भूमीअभिलेख कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी एका जणाला सहा महिन्यांची शिक्षा तर चौघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. २०१६ च्या मे महिन्यात ही घटना घडली होती. निर्दोष सुटलेल्यामध्ये मनसेचे जिल्हा पदाधिकारी गजानन ठोसर यांचा समावेश आहे.

 मलकापूर तालुक्यातील देवधाबा येथील तुकाराम सिताराम बोरसे यांच्या शेताची मोजणी २५ मे २०१६ रोजी निश्चीत करण्यात आली होती. त्यासाठीची मोजणी फी त्यांनी भूमीअभिलेख कार्यालयात भरली होती. मोजणीच्या दिवशी शेतकऱ्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हजर ठेवून मोजणीसाठी आवश्यक असलेले चुना, काठ्या, बांबू, झेंडे , मजुर यावर खर्च केला होता. मात्र ठरलेल्या दिवशी मोजणीदार शशिकांत उत्तम इंगळे हा तिथे पोहचलाच नाही. त्यामुळे दुपारी दोनला शेतकऱ्याचा मुलगा भूमी अभिलेख कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेला आता त्याला अधिकाऱ्यांनी कार्यालयातून हाकलून लावले होते. त्यामुळे जगदीश बोरसे यांनी  हरीश रावळ यांच्याशी संपर्क केला. हरीश रावळ बाहेरगावी असल्याने त्यांनी मनसेच्या परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर यांना याबाबत सांगितले.

गजानन ठोसर , राहुल जाधव, शाकीर खान, शरद खराटे , जगदीश बोरसे यांनी भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना विचारणा केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी त्याच दिवशी भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी संशयीत आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सहा वर्षे चाललेल्या या खटल्यात सरकारी पक्षाने ६ साक्षीदार तपासले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी जगदीश तुकाराम बोरसे यांना कलम ३५३ प्रमाणे दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा, १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी सात दिवसांची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश एस. व्ही. जाधव यांनी हा निकाल दिला. तर मनसेचे परिवहन जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, राहुल जाधव, शाकीर खान, शरद खराटे यांच्यावतीने ॲड. जी. डी.पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष कोल्हे यांनी काम पाहिले.